युगंधर, शिवाजी सावंत यांची 2000 साली प्रकाशित झालेली आणखी एक अप्रतीम कादंबरी, ग्रंथ म्हटलं तरी ते योग्यच ठरेल. मी त्यांची वाचलेली ही दुसरी कादंबरी, पहीली अर्थातच मृत्युंजय. युगंधरचं लेखन हे मृत्युंजयपेक्षा फार वेगळं वाटत नाही. लेखकाने श्रीकृष्णाला त्याच्या आणि इतरांच्या नजरेतून दाखवायचा प्रयत्न केला आहे आणि ते मनाला वेगळ्याच तऱ्हेने भावतं.
खरं तर युगंधर सारख्या ग्रंथाबद्दल काहीतरी लिहायचं म्हणजे जरा अवघडच त्यामुळे सारांशाचा प्रवाह हा सारखा जाणवणार नाही.
लेखकाविषयी
लेखक शिवाजी गोविंदराव सावंत (1940-2002) यांचा जन्म महाराष्ट्रात कोल्हापूर येथील शेतकरी कुटुंबातला. पुढे त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्षपदही भूषवले. मराठीतील एक दांडगा कादंबरीकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. 1995 मध्ये भारतीय ज्ञानपीठाकडून प्रतिष्ठित मूर्तिदेवी पुरस्काराने सन्मानित होणारे ते पहिले मराठी लेखक होते. मृत्युंजय, छावा, कवडसे आणि लडत हे त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ आहेत.
प्रथमतः युगंधर म्हणजे काय? तर चिरंतन. (सोप्या भाषेत सांगायचं तर नेहमी टिकणारं.) युगंधरची अलंकारिक भाषा आणि जवळपास एक हजार पानांमुळे प्रथमतः पाहिल्यावर जरा आढेवेढे घेतलेच जातील. पण मला वाटतं आधी कृष्णालाच समजाऊन घ्यावं मग ग्रंथकडं वळावं. खरं तर एवढ्या प्रचंड ग्रंथाला 5- 6 मिनिटाच्या वाचनात उतरवनं जरा अवघडच. त्यामुळे पुस्तकाचा सारांश देण्यापेक्षा एक प्रकारचा प्रवाह लिहीणं योग्य ठरेल.
श्रीकृष्ण
खरं म्हणजे कुणा नवख्या लिखाण करणाऱ्यासाठी कृष्णाबद्दलचं लिखाण हे सहज जमणारं काम नव्हे, त्यात जेवढं लिहावं तेवढं कमीच, शब्दांमध्ये त्याला बंदिस्त करणं अशक्यप्रायच वाटतं. कारण तो संपूर्ण भारतीय संस्कृतीचाच प्राण आहे.
मला कृष्णाच्या श्याम, गोविंद, केशव, माधव, द्वारकाधीश, वासुदेव या अनेक नावांपैकी युगंधर हे नाव भलतंच आवडतं. एवढं ऐकिवात नाही पण ते एकदम भारदस्त आणि त्याच वेळी प्रेमळदेखील वाटतं.
आता काहींना वाटेल श्रीकृष्णाचा एकेरी उल्लेख करणं हे कितपत योग्य आहे, तो अपमानच नाही का? पण मला असं वाटतं की कृष्णाचा एकेरी उल्लेख हे त्याचं प्रत्येकाशी असणारं वैयक्तिक नातंच अधोरेखित करतं. लहान असो किंवा मोठा, कृष्ण म्हटलं की सर्वांना सहृदय वाटतं.
श्रीकृष्णाचं वर्णन नक्की कसं करावं हा यक्षप्रश्न आहे कारण तो फक्त मेघश्याम, भुवनसुंदरच नव्हता तर तो अनेक गुणविशेषांचा पुतळा होता, चौदा कला आणि चौसष्ठ विद्यांनी युक्त पूर्णावतार होता. (चौदा कला आणि चौसष्ठ विद्या ह्या मानवाचा अत्युच्च बिंदू, पीक पॉइंट दर्शवितात.) सौंदर्य, नृत्य, गीत, वाद्य, वक्तृत्व, राजनीती, पराक्रम, अध्यात्म, ज्ञान आणि योग यांचा संचय म्हणजे कृष्ण. तो अलौकिक पराक्रमी होता तसेच एक धुर्त राजकारणीही होता, तत्ववेत्ता तसेच व्यवहारवादीही होता, समाजासाठी ग्रंथांच्या शिकवणीला विरोध करणारा होता परंतु धर्मासाठी महायुद्धाची तयारी ठेवणाराही होता, अमोघ परंतु मधाळ वक्ता होता आणि महाभारताचा करवेता नव्हे तर त्या अटळ युद्धात न्यायाचा विजय घडवणारा होता.
पण हे सगळं झालं कृष्णावर लिहिल्या गेलेल्या ग्रंथांच, साहित्याचं मत. पण माझ्या मते श्रीकृष्णाला आपण एकाच दृष्टीने पहात आलोय आणि पाहतोय. तो विष्णुचा अवतार आहे, देव आहे, बासरी वाजवून मंत्रमुग्ध करणारा, राधेवर पराकोटीचं प्रेम करणारा, महाभारताचा असलेला कणा आणि भगवद्गीतेचा रचनाकार आहे हे आपल्याला माहीत आहेच.
परंतु तो कृष्ण जो कोणतंही काम जे जीवनाला आकार देणारं आहे त्याला कमी मानत नाही, तो कृष्ण ज्याने एका आदिवासी कुमारिचा पत्नी म्हणून स्वीकार केला, तो कृष्ण ज्याने पांडवांच्या राजसूय यज्ञात स्वतः पत्रावळी उचलल्या, प्रजेसाठी जो भित्रा, पळपुटा ठरला तो कृष्ण मात्र लोकांना मान्य होत नाही. आणि युगंधरमध्ये तेच कुठेतरी जाणवतं.
पण खोच अशी की यात काही चुकीचंही वाटत नाही कारण कृष्ण कोणताही कळला तरी आपल्या संस्कृतीमध्ये किंवा लोकांच्या मनात असणारं त्याचं अस्तित्व हे निश्चल आणि न बदलता येणारं आहे. मग ते 'बाळ कृष्ण' असो किंवा 'परमेश्वर श्रीकृष्ण' असो.
ह्या क्षणी जो आपला वाटतो आणि आपण ज्याला फक्त 'कृष्ण' म्हणतो परंतु दुसऱ्याच क्षणी तोच विश्वनिर्माता सर्वव्यापी 'श्रीकृष्ण' आहे याची जाणीव होते तरी देखील दोघांमध्ये काहीही फरक न वाटावा असा तो एकमेवच.
पुस्तकाविषयी
युगंधरची प्रत्येक ओळ ही लेखकाचं भाषेवर असलेलं प्रभुत्व दाखवते. मला आवडलेली गोष्ट म्हणजे वाचताना नेहमी असं जाणवत राहतं जणू आपण एक तिसरी व्यक्ती म्हणून ह्या सगळ्या घटनांचा साक्षीदार आहोत. ही खरी सावंतांच्या लेखणाची जादू.
ग्रंथाची सुरुवात ही अश्वत्थ वृक्षाखाली पहुडलेल्या श्रीकृष्णाने होते.
त्यावेळी कृष्णाचं अप्रतिम वर्णन आहे. "माझ्या कंठात पांढर्याशुभ्र फ़ुलांची, मध्येच हिरव्याकंच पानांचे कलाश्रीमंत गुच्छ गुंफलेली टवटवीत वैजयंतीमाला विसावलेली आहे. तिला घेरून कौस्तुभमणीधारी कंठेच कंठे आणि कितीतरी सुवर्णी अलंकार छातीवर रुळताहेत. माझ्या झळझळीत पीतांबरावर अश्वत्थाची पानं चुकवून उतरलेले सूर्यकिरणांचे काही चुकार कवडसे ऐस पैस पसरलेत. त्यामुळे हे पीतांबर कसं अंगभर झळझळून उठलं आहे."
त्यानंतर पुढे रुक्मिणी, दारुक, द्रौपदी, अर्जुन, सात्यकी व उद्धव अशाक्रमाने व्यक्तीरेखा त्यांचे व श्रीकृष्णाचे नाते सांगतात, दाखवतात. यातील रुक्मिणी, द्रौपदी आणि अर्जुन हे तर सर्वांच्या परिचयाचे त्यामुळं त्यांच्या पेक्षा दारुक, सात्यकी आणि उध्दव यांच्या दृष्टीने श्रीकृष्ण पाहिला की ते बऱ्याच जणांना काहीतरी वेगळं किंवा नवीन वाटेल.
ग्रंथातील केलेलं कृष्णाचं एक वर्णन जे मला सर्वात जास्त आवडलं ते म्हणजे दारूकाचं. एक प्रकारची अभिमानी आणि अलंकारिक धार त्यातून जाणवते. दारुक ही युगंधरातील तिसरी व्यक्तिरेखा आहे. दारुक हा श्रीकृष्णाचा सारथी.
त्याच्याकडून श्रीकृष्णासाठी खालील वाक्य येतात, "एखादया कसदार चित्रकारानं सुरेख रंगसंगतीचं आकर्षक चित्र रेखाटावं आणि भवतीच्या अवघ्या विश्वानं ते डोळे विस्फारत थक्क होऊन बघावं तसं माझ्या स्वामींचं जीवनकार्य ठरलं. कुंभातून ओतल्यासारखा धो धो, सरळ कोसळणारा मुसळधार, वायुलहरींवर हिंदकळत उतरता, रिमझिमता, मध्येच थांबणारा, पुन्हा कोसळणारा, ऊन पावसाचा खेळ खेळणारा श्रावणी, अशा पर्जन्याच्या असंख्य लयी असतात. एकीसारखी मात्र दुसरी कधी असते का? नाही. तसंच आमच्या द्वारकाधीश महाराजांचं जीवन होय."
युगंधर वाचायचं म्हणजे जरा आढेवेढे घेतच मन तयार होतं पण एकदा हातात घेतलं की पुन्हा खाली ठेऊ नये असं वाटतं. त्याच्या दैवी अवतारा पलीकडचा कृष्ण युगंधरमध्ये आहे आणि तो प्रत्येकानेच समजून घ्यावा. कृष्ण म्हणजे फक्त राधेचा सखा नव्हे, जगविख्यात हिंदु देव म्हणजे कृष्ण नव्हे, सारं जग त्याची पूजाकरतं म्हणून आपणही करावं असं नाही, सोशल मीडियावर कृष्ण कृष्ण म्हणण्यापेक्षाही अधिक कृष्ण काहीतरी आहे आणि त्यासाठी खरं युगंधर वाचावं.